भाम धरणाच्या माथ्यावरील रस्ता खचला; ४० आदिवासी कुटुंबांचा संपर्क तुटण्याच्या उंबरठ्यावर

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील भामनगर-दरेवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे भाम धरणाच्या माथ्यावरून जाणारा मुख्य रस्ता धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या असून रस्त्याखालून जाणारी मोरी धसल्याने संपूर्ण मार्ग कमकुवत झाला आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती रस्त्यावर आली असून वाहतुकीचा धोका वाढला आहे. सध्या ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

हा रस्ता पूर्णपणे खचल्यास दरेवाडीतील सुमारे ४० आदिवासी कुटुंबांचा शहराशी संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिकांनी प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.