नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील परबनगर येथे दुचाकींना टार्गेट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीवन कुंज सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तब्बल आठ ते नऊ दुचाकींच्या पेट्रोलच्या नळ्या अज्ञात व्यक्तींनी कापल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पेट्रोलच्या नळ्या कापल्यामुळे अंदाजे २० ते २५ लिटर पेट्रोल वाहून गेल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर काही दुचाकींच्या सीटही फाडण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान झाले असून, पेट्रोल मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता.

या घटनेनंतर सोसायटीच्या पार्किंगच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरातील तसेच सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकारामागील अज्ञात व्यक्तींचा शोध घ्यावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

 

तसेच इंदिरानगर परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.