नाशिकच्या सिडको आणि इंदिरानगर परिसरातील अनेक सार्वजनिक उद्यानांची दुरवस्था समोर आली आहे. उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढल्याने, चिखल साचल्याने आणि पावसाचे पाणी तुंबल्याने नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरणे तसेच व्यायाम करणे कठीण झाले आहे.

उद्यानांमध्ये बसविण्यात आलेली ग्रीन जिमची उपकरणे आणि लहान मुलांसाठीची खेळणीही गवताखाली झाकली गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांसह लहान मुलांनाही या सुविधांचा लाभ घेणे अवघड झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून गाजरगवत हटवावे, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा आणि उद्यानांची नियमित देखभाल व दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढण्याची शक्यता असून, डेंग्यू आणि मलेरियासारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याचीही चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.