शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. राजीव गांधी भवन येथे झालेल्या या आंदोलनात पोवाड्याच्या माध्यमातून नाशिकमधील रस्त्यांची समस्या मांडण्यात आली.

छबू नागरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोवाड्याच्या माध्यमातून प्रशासनावर टीका करत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

नाशिक शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.

यापूर्वीही खड्ड्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने झाली आहेत. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जनजागृतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पोवाड्याच्या माध्यमातून यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. नाशिकच्या खराब रस्त्यांचा मुद्दा पोवाड्यातून मांडत तातडीने खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.