नाशिकमधील सराफ बाजार ते आर.के. रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग सध्या मोठे खड्डे, चिखल आणि घसरड्या रस्त्यामुळे धोकादायक बनला आहे. पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर दररोज दुचाकी घसरण्याच्या घटना घडत असून अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. विशेषतः चढाच्या भागात चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे.

या परिसरात दररोज हजारो नागरिक खरेदीसाठी येत असल्याने व्यापारी आणि ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ आश्वासने मिळाल्याचा आरोप स्थानिक दुकानदारांनी केला आहे.

स्थानिकांच्या मते, महानगरपालिका आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. आणखी एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आता सराफ बाजारातील हा महत्त्वाचा रस्ता नेमका कधी दुरुस्त होणार, याकडे नागरिक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.