येवला तालुक्यातील रायते शिवारातील हॉटेल नंदन ते जगताप वस्ती तसेच हॉटेल नंदन ते चिचोंडी शिवार या मार्गांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत असल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, येवला-निफाड महामार्गाच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने या परिसरातून मुरूम काढण्याची परवानगी घेतली होती. त्यावेळी या बदल्यात संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, अद्याप कोणतेही काम सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर युवा नेते कुणाल दराडे यांनी परिसराची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी प्रशासनाने आठ दिवसांच्या आत रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी केली.
मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आता प्रशासन या प्रश्नावर कितपत तत्परतेने निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


