मुंबई–नाशिक–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इगतपुरीजवळ पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. माणिकखांब ते गोंदे औद्योगिक वसाहतीदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

वीकेंडमुळे पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली होती. त्याचबरोबर पावसाचा परिणाम आणि सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला. त्यामुळे शेकडो चारचाकी, दुचाकी आणि मालवाहू वाहने महामार्गावर अडकून पडली.

वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांचा वेळ वाया गेला असून प्रवासाचा कालावधीही वाढला. काही ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्याने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

दरम्यान, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. वाहनचालकांनी संयम बाळगावा, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.