कल्याण-डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढत्या डॉग बाईटच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवघ्या सहा महिन्यांत शहरात १८ हजार ४४७ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये कल्याण-डोंबिवली परिसरात २१ हजारांहून अधिक डॉग बाईटच्या घटना नोंदल्या गेल्या होत्या. तर यंदाच्या वर्षात पहिल्या सहा महिन्यांतच हा आकडा १८ हजारांच्या पुढे गेला आहे.

रुक्मिणीबाई रुग्णालयासह विविध आरोग्य केंद्रांमध्ये डॉग बाईटच्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. काही दिवसांतच मोठ्या प्रमाणात नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यावरून चालणारे नागरिक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांत तब्बल २०० नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंदही करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाकडून नागरिकांना कुत्रा चावल्यानंतर विलंब न करता तातडीने रुग्णालयात जाऊन उपचार आणि रेबीज प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.