बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-अकोला मार्गावर गोवंशाची निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. टेंभूर्णा फाट्याजवळ खामगाव ग्रामीण पोलिसांनी संशयित वाहन अडवून चार बैलांची सुटका केली. या प्रकरणी वाहनचालकासह तिघांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता चार बैल दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचं आढळून आलं. बैलांना हालचाल करण्यासाठी पुरेशी जागाही नव्हती. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता.

गोवंश वाहतुकीसाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र, इअर टॅगिंग आणि अधिकृत कागदपत्रे वाहनात आढळून आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोरक्षकांना गोवंश कत्तलीसाठी बाळापूरच्या दिशेने नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने वाहन अडवण्यात आलं.

वाहनचालकासह वाहनातील दोघांची चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत तिघांवर कारवाई सुरू आहे.

सुटका करण्यात आलेल्या चारही बैलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.