मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीच्या कामासाठी मंगळवारी, ८ सप्टेंबरला १२ तासांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. जळगाव–म्हसावद दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
ब्लॉकदरम्यान इगतपुरी–भुसावळ–इगतपुरी मेमू, भुसावळ–देवळाली–भुसावळ मेमू आणि नाशिक रोड–बडनेरा–नाशिक रोड मेमू या गाड्या पूर्णपणे रद्द राहणार आहेत.
पूर्णपणे रद्द असलेल्या गाड्या
- गाडी क्रमांक १९११९/१११२० — इगतपुरी–भुसावळ–इगतपुरी मेमू
- गाडी क्रमांक ११११३/११११४ — भुसावळ–देवळाली–भुसावळ मेमू
- गाडी क्रमांक ६११२९/६१९३० — नाशिक रोड–बडनेरा–नाशिक रोड मेमू
वेळेत बदल असलेल्या गाड्या
अजनी–पुणे वंदे भारत एक्सप्रेस आणि भुसावळ–दादर एक्सप्रेसच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
- गाडी क्रमांक २६१०२ — अजनी–पुणे वंदे भारत एक्सप्रेस दुपारी १२:५० वाजता सुटणार.
- गाडी क्रमांक १९००४ — भुसावळ–दादर एक्सप्रेस सायंकाळी ६:४० वाजता सुटणार.
याशिवाय अमृत भारत एक्सप्रेस माहेजी स्थानकावर थांबवण्यात येणार असून, बालिया–एलटीटी एक्सप्रेस भादली स्थानकावर थांबवून ठेवण्यात येणार आहे.
रेल्वेच्या या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांच्या नियोजित प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी.


