नाशिक : शहरात ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढला असून, गेल्या आठवडाभरापासून कमाल तापमानाचा पारा सातत्याने पस्तिशीपार राहत आहे. दिवसा वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेसोबतच रात्रीच्या उकाड्यामुळेही नाशिककर त्रस्त झाले आहेत. मंगळवारी (दि. १३) शहरातील कमाल तापमानाची नोंद ३५.५ अंश सेल्सिअस इतकी झाली.
गेल्या बुधवारपासून सलग मंगळवारपर्यंत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे राहिल्याने उन्हाची तीव्रता जाणवत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात होते. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिक टोपी, छत्री आणि स्कार्फचा वापर करताना दिसत आहेत.
दिवसा उन्हाचा तडाखा, तर रात्री उकाडा अशा दुहेरी परिस्थितीचा सामना नाशिककरांना करावा लागत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा चढा राहिल्याने शहरात उन्हाची तीव्रता कायम आहे.
दरम्यान, हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी मंगळवारनंतर, म्हणजेच २० ऑक्टोबरनंतर कमाल तापमानात घट होऊन काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, तोपर्यंत तापमान चढे राहण्याचा अंदाज असल्याने नाशिककरांना ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागू शकतो.


