दाढेगाव पुलावरून दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या २८ वर्षीय अभिषेक जाधव यांचा अखेर ७२ तासांनंतर मृतदेह सापडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात येत होती.

आज दुपारच्या सुमारास पिंपळगाव पुलाजवळ पाण्यात एक मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.

यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया पार पडली. ओळख निश्चित झाल्यानंतर तो मृतदेह अभिषेक जाधव यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. सलग तीन दिवस सुरू असलेल्या शोधमोहीमेचा अशा प्रकारे दुःखद शेवट झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी अभिषेक जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात पूरग्रस्त भाग, साकव आणि पुलांवरून प्रवास टाळण्याचे तसेच कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन केले आहे.