नाशिक : पाथर्डी–दाढेगाव पुलावरून युवक वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर शोधमोहीम सुरू असून, घटनेला ४८ तास उलटले तरी युवकाचा ठावठिकाणा लागलेला नाही. पुराच्या पाण्याचा वेग आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.
पुलावरून दुचाकीसह युवक वाहून गेल्याची घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले होते. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. एनडीआरएफच्या पथकानेही दोन दिवस परिसरात शोध घेतला.
मात्र, अद्याप युवकाचा शोध लागलेला नाही. दरम्यान, दाढेगाव पुलावर अजूनही पाणी वेगाने वाहत असून पूरस्थिती कायम आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग धोकादायक बनतो. पुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना पूरस्थितीत धोकादायक पुलांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बेपत्ता युवकाचा शोध घेण्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे.


