बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी होत आहे. उत्तर भारतासह देशातील विविध राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तीन ते चार तास रांगेत उभे राहून दर्शन घेतल्याचे सांगितले. मुंबईहून आलेल्या एका भाविकाने श्रावण सोमवाराचे विशेष महत्त्व सांगत दर्शनाबरोबरच महामृत्युंजय जपाचा शुभारंभ केल्याची माहिती दिली.

महाबळेश्वरहून आलेल्या दुसऱ्या भाविकाने मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवल्यानंतर परिसर अधिक प्रशस्त झाल्याचे सांगत व्यवस्थापनाचे कौतुक केले. मात्र नाशिक ते त्र्यंबकेश्वर या मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे अल्प अंतराचा प्रवास करण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची सुधारणा झाल्यास भाविकांना अधिक सोयीस्कर प्रवास करता येईल, अशी अपेक्षाही भाविकांनी व्यक्त केली. दरम्यान, मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम असून प्रशासनाकडून व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.