शहरातील अनेक दिशादर्शक कमानींवर वाढदिवस, अभिनंदन तसेच राजकीय शुभेच्छांचे फलक लावण्यात आल्याने मूळ दिशादर्शक झाकले जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शहरात प्रथमच येणारे वाहनचालक तसेच पर्यटकांना योग्य मार्ग शोधताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दिशादर्शक कमानींचा उद्देश नागरिकांना आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना विविध ठिकाणांचा मार्ग सहज उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र अनधिकृत फलकांमुळे या कमानींचा मूळ उपयोगच कमी होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दिशादर्शक कमानी स्पष्ट दिसणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
यामुळे संबंधित यंत्रणांनी दिशादर्शक कमानींवरील अनधिकृत फलक तातडीने हटवून मूळ दिशादर्शक पूर्ववत करावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. भाविक, पर्यटक आणि वाहनचालकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी लवकरात लवकर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


