नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून दुगाव परिसरातील ब्राम्हणी नदीला पूर आला आहे. नदी पात्राबाहेर वाहू लागल्याने दुगावसह चार ते पाच गावांचा संपर्क तात्पुरता तुटला असून स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पूराच्या पाण्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. काही ठिकाणी नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून पूरग्रस्त भागांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, पुराच्या पाण्यात उतरू नये तसेच अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


