बीएचएमएस डॉक्टरांना CCMP कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने तीव्र विरोध दर्शवला आहे. या निर्णयाविरोधात नाशिकमधील शालिमार परिसरातील IMA सभागृहात पत्रकार परिषद घेऊन संघटनेने शासनाकडे प्रस्ताव तातडीने मागे घेण्याची मागणी केली.

यावेळी IMA पदाधिकाऱ्यांनी रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत संबंधित प्रस्तावामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असे मत व्यक्त केले. या निषेधार्थ IMAच्या वतीने २४ तास वैद्यकीय सेवा बंद आंदोलन करण्यात आले. राज्यातील विविध वैद्यकीय संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती देण्यात आली.

शासनाने हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी करत निर्णयात बदल न झाल्यास भविष्यात बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा IMAने दिला आहे. या मुद्द्यावर शासनाची भूमिका काय राहते आणि पुढे कोणता निर्णय घेतला जातो, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.