गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पंचवटी, रामकुंड आणि गंगाघाट परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
पाहणीदरम्यान त्यांनी रामकुंड आणि गंगाघाट परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. पूराच्या पाण्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याची तसेच काही ठिकाणी जुन्या वाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
यावेळी आमदार राहुल ढिकले यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संबंधित यंत्रणांनी बचाव व मदतकार्य अधिक वेगाने राबवावे, तसेच नदीकाठच्या धोकादायक भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि नदीपात्र तसेच पूरग्रस्त भागात विनाकारण जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले.


