नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या तिन्ही हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानाला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रपतींचा मुक्कामही याच ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रपती नवी दिल्लीहून भारतीय वायुसेनेच्या विमानाने ओझर विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये येतील. प्रोटोकॉलनुसार त्यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर असल्याने एकाच ठिकाणी सुरक्षित लँडिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाकडून विविध मैदानांची पाहणी करण्यात आली.
यामध्ये शहर पोलीस आयुक्तालयाचे कवायत मैदान, केटीएचएम महाविद्यालय, भोसला मिलिटरी स्कूल आणि छत्रपती संभाजीनगर रोडवरील विडी कामगार मैदानाचा समावेश होता. मात्र, सुरक्षितता आणि सोयीच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस अकादमीचा पर्याय पुढे आला आहे.
३१ ऑक्टोबरला रामतीर्थावर ध्वजारोहणानंतर राष्ट्रपती त्र्यंबकेश्वरला भेट देण्याची, तसेच सायंकाळी गोदावरी आरतीसाठी पुन्हा रामतीर्थावर येण्याची शक्यता आहे. या संपूर्ण दौऱ्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक बंदोबस्ताचा आढावा घेतला जात आहे. हेलिकॉप्टर लँडिंगचे अंतिम ठिकाण अद्याप निश्चित झाल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.


