नाशिकमधील कथित म्हाडा घोटाळा प्रकरणात सरकारवाडा पोलिसांनी आणखी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी दिलीप कचरू वामन आणि सेवानिवृत्त मंडळ अधिकारी श्याम एकनाथ बोरसे यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भूमी अभिलेख विभागाकडील कथित बनावट मोजणी नकाशे, हिस्सा फॉर्म, गटबुक आणि इतर कागदपत्रांची आवश्यक पडताळणी न करता फेरफार नोंदी मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. काही प्रकरणांमध्ये तहसील कार्यालयाचे आदेश नसतानाही फेरफार नोंदी प्रमाणित करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात विकासक, जमीनमालक आणि गुंतवणूकदार यांच्याशी संगनमत करून १४ सर्व्हे गटांमधील फेरफार नोंदी मंजूर केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या कथित गैरव्यवहारामुळे म्हाडा आणि शासनाची फसवणूक झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
यापूर्वी या प्रकरणात नायब तहसीलदार, भूमी अभिलेख अधिकारी, नगररचना अधिकारी तसेच काही बिल्डरांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणातील सर्व आरोप हे पोलिसांच्या तपासावर आधारित असून अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.


