नाशिक : नाशिकरोड परिसरातील सत्कार पॉईंट येथे भेळ खाण्यास गेलेल्या एका तरुणावर जुन्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून आरोपींविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री सावता माळी स्वीट सत्कार पॉईंट परिसरात संदीप चटोले हा भेळ घेण्यासाठी गेला असता दीपक उर्फ नान्या गांगुर्डे, वैभव डोळस आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला अडवले. यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
यानंतर आरोपींनी कोयत्याने संदीप चटोले यांच्या डोक्यावर, बरगडीवर आणि पायावर वार करत त्याला गंभीर जखमी केले.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.


