नाशिक: नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण व उत्पीडन प्रकरणातील आरोपी निदा खान हिला मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे.

न्यायमूर्ती खारकर यांच्या न्यायालयाने २० ऑगस्ट रोजी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याची माहिती आहे. जामिनाच्या अटींनुसार तिला संबंधित पोलीस ठाण्यात नियमित हजेरी द्यावी लागणार आहे.

या प्रकरणात टीसीएस नाशिक कार्यालयातील ३६ वर्षीय व्यक्तीला कार्यालयात नमाज पढण्यास भाग पाडणे, मुस्लिम समाजाच्या चालीरीती अनुसरण्यास सांगणे, हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणे आणि धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

या आरोपांप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६६/२०२६ दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला या प्रकरणात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पुढे गेल्यानंतर निदा खान हिचा सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद करत तिचा पाचवी आरोपी म्हणून समावेश केला.

यापूर्वी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील संबंधित गुन्ह्यातही निदा खानला जामीन मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान तपासात सहकार्य करत असल्याचा मुद्दा निदा खानच्या बाजूने मांडण्यात आला. तिच्यावतीने अॅड. प्रतीक ताजनपुरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि इतर आरोपींची भूमिका याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रियेत पुढील सुनावण्या आणि तपासातील निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत.