सातपूर एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गुरुवारी सकाळी सेंट्रल बँकेसमोर पिंपळाचे झाड थेट विद्युत डीपीवर कोसळले. या घटनेत विजेचा खांब रस्त्यावर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

झाड कोसळल्यानंतर काही काळ परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला. रस्त्यावर विजेचा खांब पडल्याने नागरिक आणि वाहनचालकांना सावधगिरी बाळगावी लागली. घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि महावितरणचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेतले तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू केले.

दरम्यान, सततच्या पावसामुळे धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांची तातडीने छाटणी किंवा हटविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.