दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या अवेळी लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतीची कामे, पाणीपुरवठा आणि रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याने माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाला निवेदन सादर केले.
निवेदनाद्वारे अवेळी सुरू असलेले लोडशेडिंग तातडीने बंद करून नियमित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. पुढील २४ तासांत लोडशेडिंग रद्द न झाल्यास संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला.
यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती माजी आमदार धनराज महाले यांनी दिली.
दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने रात्रीच्या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री जावे लागत असल्याने वीज नसल्यामुळे अपघात आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.


