दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षा, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद नाशिकमध्येही उमटले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी आणि विविध संघटनांनी निदर्शने करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

आंदोलनकर्त्यांनी NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.