नाशिक : आरडी सर्कल ते पांगरेनगर या महत्त्वाच्या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल आणि साचलेल्या पाण्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने अनेकदा वाहनचालकांची दिशाभूल होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. दररोज शेकडो नागरिक आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

विशेषतः दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाला या समस्येचा मोठा फटका बसत आहे. चिखल आणि पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून या मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. केवळ तात्पुरते डांबरीकरण न करता कायमस्वरूपी उपाययोजना करून या मार्गाची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

नागरिकांच्या मते, वेळेत दुरुस्ती न झाल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.