इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून ट्रॉपिकल रिसॉर्ट परिसरातील एका वाडीत अडकलेल्या १६ नागरिकांसह एका श्वानाची प्रशासनाने सुखरूप सुटका केली. महसूल विभाग, पोलीस, रेस्क्यू पथक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून बोटीच्या साहाय्याने हे बचावकार्य यशस्वीपणे पार पाडण्यात आले.
गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. भावली धरणाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून काही ठिकाणी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
ट्रॉपिकल रिसॉर्टच्या मागील वाडीत पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने रहिवासी बाहेर पडू शकत नव्हते. अडकलेल्यांमध्ये महिला, वृद्ध, लहान मुले तसेच एका श्वानाचाही समावेश होता.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या नेतृत्वाखाली बचाव मोहीम सुरू करण्यात आली. बोटीच्या साहाय्याने सर्वांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून सुटका करण्यात आलेल्या नागरिकांसाठी तहसील प्रशासनाने तात्पुरत्या निवाऱ्याची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर राखावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


