माणिकखांबजवळ वंदे भारत एक्स्प्रेसला रन ओव्हर; ३० वर्षीय युवक गंभीर जखमी
नाशिकजवळ माणिकखांब परिसरात वंदे भारत एक्स्प्रेसला रन ओव्हरची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर घडलेल्या या दुर्घटनेत ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे.
घटना घडल्यानंतर जखमी युवकाला तातडीने उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर वंदे भारत एक्स्प्रेस माणिकखांबजवळ सुमारे अर्धा तास थांबली होती. जखमी युवकाला रुग्णालयात हलवल्यानंतर रेल्वे नाशिकच्या दिशेने रवाना झाली.
या घटनेमुळे रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही करण्यात आली.
रन ओव्हरची ही घटना नेमकी कशी घडली, याबाबतची अधिक माहिती संबंधित रेल्वे यंत्रणेकडून तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे माणिकखांब परिसरात काही काळ खळबळ निर्माण झाली.
आपलं नाशिक | आपला आवाज


