नाशिक विभागातील अकरावी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, यंदा एकूण २ लाख २५ हजार ८२५ जागांपैकी १ लाख ५० हजार ८५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. प्रवेश प्रक्रियेतील आकडेवारीनुसार विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांचा कल स्पष्ट होत आहे.
यंदाही विज्ञान शाखेने सर्वाधिक पसंती मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र, यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत कला शाखेने वाणिज्य शाखेला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवा आणि विविध करिअरच्या नव्या संधींमुळे विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे वाढता कल दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील १ लाख १६ हजार १४० जागांपैकी ६५ हजार ९४६ विद्यार्थ्यांनी कॅप आणि कोटा प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतला आहे. प्रवेश प्रक्रियेतील ही आकडेवारी विद्यार्थ्यांच्या बदलत्या शैक्षणिक पसंतीचे चित्र स्पष्ट करते.
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांनी विविध शाखांची निवड करताना भविष्यातील करिअरच्या संधींचा विचार केल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.


