नाशिकच्या कालिदास कला मंदिरात नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विविध वयोगटातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या शास्त्रीय नृत्याविष्कारांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘नदी आणि नारी’ या संकल्पनेवर आधारित नृत्यनाट्यातून नदी संवर्धनाचे महत्त्व आणि स्त्रीशक्तीचा सन्मान यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. कलात्मक सादरीकरणातून सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक मूल्यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
याशिवाय चिमुकल्या विद्यार्थिनींनी बालगीतांवर सादर केलेल्या भरतनाट्यम नृत्यांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली. वरिष्ठ विद्यार्थिनींच्या शास्त्रीय नृत्यरचनांनी कार्यक्रमाला अधिक उंची दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सादर करण्यात आलेली गोदावरी आरती हा संपूर्ण सोहळ्याचा भावपूर्ण आणि आकर्षक क्षण ठरला.
कला, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवणाऱ्या या कार्यक्रमाला पालक, रसिक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


