एमपीएससी, NEET, TET, CET तसेच विविध भरती परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहारांच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.

आंदोलनादरम्यान पेपरफुटीच्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी, दलाल आणि संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा परीक्षांवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी संबंधित प्रकरणांचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. दोषींवर कठोर कारवाई झाल्यास भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करता येईल, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.