नाशिक : दिवाळी म्हटलं की नातेवाईक, मित्रपरिवार आणि व्यावसायिकांना भेटवस्तू देण्याची लगबग सुरू होते. विशेषतः कॉर्पोरेट कंपन्यांकडून कर्मचारी, ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांना सुकामेव्याची आकर्षक गिफ्ट बॉक्स देण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा भू-राजकीय तणावामुळे सुकामेव्याच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसह कॉर्पोरेट कंपन्यांनाही महागाईचा फटका बसत आहे.
सुकामेव्याच्या वाढलेल्या किमतींमुळे यंदा दिवाळीच्या भेटवस्तूंच्या बाजारपेठेत पर्यायांना मागणी वाढताना दिसत आहे. महागडे काजू, बदाम, पिस्ता आणि इतर सुकामेवा असलेल्या गिफ्ट बॉक्सऐवजी आता भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, कलिंगडाच्या बिया आणि चिया बियांचा समावेश असलेल्या भेटवस्तूंना पसंती दिली जात आहे. आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध असलेल्या या गिफ्ट बॉक्स बजेटमध्ये बसणाऱ्या आणि आरोग्यपूरक पर्याय म्हणून ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेत अशा बियांच्या भेटवस्तूंच्या मागणीत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गिफ्ट विक्रेते आणि व्यावसायिकांकडूनही ग्राहकांच्या बदलत्या पसंतीनुसार विविध प्रकारच्या भेटवस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
एकीकडे महागाईमुळे पारंपरिक सुकामेव्याच्या भेटवस्तूंचे बजेट वाढले असताना, दुसरीकडे आरोग्यपूरक आणि परवडणाऱ्या पर्यायांना मिळणारी पसंती यंदाच्या दिवाळीच्या बाजारपेठेतील महत्त्वाचा बदल ठरत आहे. त्यामुळे यंदा दिवाळीच्या गिफ्टमध्ये सुकामेव्याऐवजी विविध बियांचे आकर्षक पॅक चर्चेचा विषय ठरत आहेत.


