नाशिक : जुन्या नाशिकमधील डिंगरअळी परिसरात असलेले पोपडा देवीचे स्थान हे नाशिककरांसह हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. गेल्या दीडशे वर्षांहून अधिक काळापासून या देवीची परंपरा जपली जात असून, नवरात्रोत्सवातील अष्टमीच्या काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. भिंतीचा पोपडा गळून पडल्यावर त्यामध्ये देवीची नैसर्गिक आकृती प्रकट होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच वैशिष्ट्यामुळे या देवीला ‘पोपडा देवी’ म्हणून ओळखले जाते.

नवरात्रोत्सवात आश्विन शुक्ल सप्तमीच्या मध्यरात्री बारा वाजता मंदिराच्या भिंतीवर देवीचे आगमन होते किंवा ती प्रकट होते, अशी मान्यता आहे. त्यानंतर अष्टमीच्या दिवशी सकाळी देवीची विधिवत पूजा-अर्चा करण्यात येते. होम-हवन आणि महाआरतीसह विविध धार्मिक विधी पार पडतात. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास देवी पुन्हा लुप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांना मर्यादित कालावधीच उपलब्ध असतो.

देवीच्या दर्शनासाठी अष्टमीच्या रात्रीपासूनच नाशिक शहरासह परिसरातील भाविक डिंगरअळी येथे दाखल होतात. दर्शनासाठी होणारी गर्दी आणि भाविकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे.

या सोहळ्याचे आयोजन आणि व्यवस्थापन स्थानिक जनता मित्र मंडळ तसेच पोपडादेवी महिला मंडळाच्या वतीने केले जाते. श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक भावनेचा अनोखा संगम असलेले पोपडा देवीचे स्थान नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान मानले जाते.