नाशिक : सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवात मानाचे स्थान असलेल्या रामकुंडाजवळील चतुःसंप्रदाय आखाड्याचे ऐतिहासिक रावणदहन यंदाही दणक्यात पार पडणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांमुळे हा परिसर बंद राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने यंदाच्या रावणदहनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते; मात्र, आखाड्यातर्फे ही ५९ वर्षांची अखंड परंपरा यंदाही कायम राखली जाईल, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
सन १९६७ मध्ये महापालिका आखाड्याचे तत्कालीन महंत दीनबंधुदास महाराज यांनी रामकुंड परिसरात या रावणदहनाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर महंत कृष्णचरणदास महाराज यांनी ही परंपरा मोठ्या निष्ठेने पुढे चालवली. आज नाशिक शहरातील रावणदहनाची ही सर्वात जुनी आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा मानली जाते. विजयादशमीच्या दिवशी रामकुंड, गांधी ज्योत, गांधी तलाव, होळकर पूल आणि रामकुंड वाहनतळ परिसर नागरिकांनी खचून भरतो. रावणदहनापूर्वी होणारी मनमोहक आणि आकर्षक आतषबाजी पाहण्यासाठी संपूर्ण नाशिककर येथे हजेरी लावतात.
सध्या रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची गडबड सुरू आहे. ही कामे ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून हा भाग येत्या पंधरा-वीस दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे नागरिक आणि भाविकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, आता रावणदहन होणार ककी नाही याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागून आहे..


