चांदवड :
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पडताळणी अभियानांतर्गत चांदवड विधानसभा मतदारसंघात कामाला वेग आला आहे. आतापर्यंत सुमारे ८० टक्के प्रपत्रांचे वाटप पूर्ण झाले असून नागरिकांनी बूथस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
३० जून ते २९ जुलै या कालावधीत बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदार पडताळणीचे काम करत आहेत. यामध्ये नवीन मतदार नोंदणी, स्थलांतरित व मृत मतदारांची नोंद, वारस पडताळणी तसेच दावा आणि हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
चांदवड विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ११ हजार ८८८ मतदार असून त्यापैकी सुमारे ८० टक्के मतदारांना प्रपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. प्राप्त प्रपत्रांचे संगणकीकरणाचे कामही प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
वेळेत प्रपत्र भरून आवश्यक कागदपत्रांसह बूथस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. अन्यथा भविष्यात मतदार यादीत नाव नोंदविण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


