नाशिक आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ₹7,801 कोटींच्या आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. चाकण आणि खेड औद्योगिक पट्ट्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून हा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होईल, तसेच नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
केंद्र सरकारचे उद्दिष्ट २०३०-३१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी होण्यास आणि वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.


