नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथे रस्त्याअभावी अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या निधनानंतर रुग्णवाहिका वस्तीपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना चिखलातून बैलगाडीतून पार्थिव गावात आणावे लागले.
पावसाळ्यात रस्ता नसल्याने या परिसरातील नागरिकांना दरवर्षी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. चिखल आणि खराब रस्त्यांमुळे अत्यावश्यक सेवांनाही वस्तीपर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे.
रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू न शकल्याने ग्रामस्थांनी स्वतःच्या प्रयत्नातून बैलगाडीची व्यवस्था करून पार्थिव गावात आणले. या घटनेमुळे परिसरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पक्का रस्ता उभारण्याची मागणी केली असून, पावसाळ्यात नागरिकांना अशा अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


