नाशिकच्या पेठ तालुक्यातील पाहुचीबारी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत झाली आहे.
या शाळेत तब्बल २६७ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शाळेच्या इमारतीची दुरवस्था लक्षात घेता विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ग्रामस्थांनी आपल्या घरांमध्येच वर्ग भरवण्याची व्यवस्था केली आहे.
शाळेची इमारत धोकादायक अवस्थेत असल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, धोकादायक शाळेची इमारत पाडून त्याच ठिकाणी दुमजली आठ खोल्यांची सुसज्ज शाळेची इमारत उभारावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
नवीन इमारत उभारल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि योग्य शैक्षणिक वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.
प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तातडीने नवीन शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.