नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) गरीब लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याच्या वितरणात मोठ्या प्रमाणावर वजनात तफावत आढळत असल्याने रेशन दुकानदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गोदामातून धान्य बाहेर पडतानाच ते मोजून देण्याऐवजी, पुरवठा विभागाने दुकानदारांनाच दुकानात धान्य मोजून घेण्याचे आदेश काढल्याने संघटनेने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रेशन दुकानदारांच्या आरोपानुसार, धान्य गोदामातून वाहनात भरताना हमालांना वाहनात बसवूनच गाड्यांचे वजन केले जाते. त्यामुळे सुमारे १५० ते २०० किलो वजन धान्याच्या पावतीत अतिरिक्त धरले जाते. प्रत्यक्षात दुकानात माल पोहोचल्यावर प्रत्येक पोत्यामागे २ ते ३ किलो धान्य कमी भरते. ४० क्विंटलच्या लहान साठ्यामागेही सुमारे एक क्विंटल धान्य कमी मिळत असल्याने दरमहा धान्याचा मोठा फरक निर्माण होत आहे. धान्य कमी असूनही ते परत नेले जात नसल्याने नाईलाजाने ते उतरवून घ्यावे लागते.

 

जिल्ह्यात दरमहा लाखो किलो धान्य गायब?

 

नाशिक जिल्ह्यात २,६०० स्वस्त धान्य दुकाने असून शहरात २३० दुकाने आहेत. जिल्ह्यात दरमहा १ कोटी ५५ लाख ४५ हजार ११० किलो धान्याचे वाटप केले जाते. या हिशोबानुसार दरमहा सुमारे ३ लाख किलो धान्याची तफावत येत असून, तीन महिन्यांचा साठा एकत्र येतो तेव्हा हा फरक तिप्पट होतो. त्यामुळे रस्त्यात धान्य कमी कसे होते याची चौकशी करण्याऐवजी दुकानदारांनाच बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.