त्र्यंबकेश्वरमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असताना विकास आराखड्यातील एका निर्णयामुळे आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुंभमेळ्यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या ‘दर्शन पथा’चा मार्ग मोकळा करण्यासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाची जागा घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज शहरापासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर दूर तुपादेवी फाटा येथील स्वामी विवेकानंद रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर शहरासह आसपासच्या अनेक गावांतील नागरिक उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत.

रुग्णालय शहरापासून दूर गेल्याने अपघातातील जखमी, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळवताना अडचणी निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करताना स्थानिक नागरिकांच्या आरोग्यसेवेच्या गरजांकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.

विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयाचे अंतर वाढल्यामुळे उपचारासाठी लागणारा वेळ वाढू शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात ‘दर्शन पथा’सोबतच त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेची पर्यायी व सक्षम व्यवस्था उभी करण्याची गरज व्यक्त होत आहे.