नाशिक :
नाशिकमध्ये अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी सहा रुपयांना मिळणारे एक अंडे आता ९ ते १० रुपयांपर्यंत विकले जात असून किरकोळ बाजारात दरात सुमारे तीन रुपयांची वाढ झाली आहे.
अंडी उत्पादक आणि विक्रेत्यांच्या मते, पोल्ट्री फीडसाठी लागणाऱ्या मका आणि सोयापेंडच्या वाढलेल्या किमतींमुळे उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाढीव खर्चाचा परिणाम थेट अंड्यांच्या किरकोळ दरावर झाला आहे.
अंड्यांसह चिकन, मटण आणि भाज्यांच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. महागाईमुळे ग्राहकांकडून अंड्यांची खरेदी कमी होत असल्याचे विक्रेते सांगत असून त्याचा फटका किरकोळ विक्रेत्यांनाही बसत आहे.
दरवाढीमुळे प्रथिनांचा स्वस्त स्रोत मानल्या जाणाऱ्या अंड्यांचे सेवनही अनेक कुटुंबांनी कमी केल्याचे चित्र नाशिकमध्ये दिसून येत आहे.


