नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील 46 सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

श्रावण महिना, ईद-ए-मिलाद आणि आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

या कारवाईत शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 19, म्हसरूळमधून 9, आडगावमधून 2, भद्रकालीमधून 6, मुंबई नाका येथून 2, सरकारवाडा येथून 1 आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 7 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

सणांच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.