कराड : शेतकऱ्यांबाबत आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या कथित असंवेदनशील वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील कराड येथे युवक काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचे भटक्या कुत्र्यांकडून लचके तोडले जात असल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या माध्यमातून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
दरम्यान, येत्या २४ तासांत संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश करचे यांनी केली आहे. अन्यथा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासोबतच दिसेल त्या ठिकाणी काळे फासण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्यावरून सुरू झालेला हा वाद आता आंदोलनाच्या माध्यमातून अधिक तीव्र होताना दिसत आहे.


