नाशिक : शहरातील एबीबी सिग्नल परिसरात बुधवारी (दि. २१) सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. आयटीआय ते एबीबी सिग्नल या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा वेग आधीच मंदावला होता. त्यात सिग्नल बंद पडल्याने चौकाच्या चारही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी, संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेली खोदकामे आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतुकीवर आधीच ताण निर्माण झाला आहे. अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्यांकडे वळवण्यात आल्याने शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये कोंडीची समस्या जाणवत आहे. त्यातच एबीबी सिग्नलवरील यंत्रणा बंद पडल्याने नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली.

वाहतूक कोंडीतून मार्ग काढत घटनास्थळी पोहोचण्यासाठी वाहतूक पोलिसांनाही प्रयत्न करावे लागले. काही वाहनचालकांनी नियम धाब्यावर बसवत पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ अधिक वाढला. सिग्नल यंत्रणेतील बिघाड, सुरू असलेले रस्त्याचे काम आणि वाहतूक नियोजनातील त्रुटी यांमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र होते.

एकीकडे सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याची रंगीत तालीम सुरू असताना दुसरीकडे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. महत्त्वाच्या चौकांमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि प्रभावी नियंत्रण यंत्रणा तैनात करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.