नाशिक : ऑक्टोबर हिटचा तडाखा आणि कुंभमेळ्याच्या कामांमुळे आधीच विस्कळीत झालेली नाशिक शहरातील वाहतूक मंगळवारी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने आणखी खोळंबली. शहरातील अनेक प्रमुख चौकांतील सिग्नलचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वीजदेयके थकल्यामुळे सिग्नल बंद पडल्याची चर्चा सुरू झाली असली, तरी महापालिकेच्या विद्युत विभागाने नियमितपणे देयके भरली जात असल्याचा दावा केला आहे.
शहरात स्मार्ट सिटीचे चाळीस आणि महापालिकेचे वीस, असे एकूण साठ सिग्नल आहेत. सीबीएस, गंगापूर नाका, जुने पोलीस आयुक्तालय, राजीव गांधी भवन आणि तारवालानगरसह अनेक चौकांतील सिग्नल बंद असल्याचे दिसून आले. परिणामी, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डनना रस्त्यावर उतरावे लागले.
दरम्यान, ग्रामीण भागातील वाढती विजेची मागणी आणि भारनियमनाच्या पार्श्वभूमीवर पथदिव्यांच्या वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात आल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी पथदिवे आणि सिग्नलसाठी एकच वीजजोडणी असल्याने पथदिव्यांचा पुरवठा बंद करताना सिग्नलही बंद पडल्याचे सांगण्यात आले.
सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणेचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापालिकेने महावितरणशी समन्वय साधला आहे. बंद सिग्नलची यादीही महावितरणला पाठविण्यात आली आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद पडण्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे वीजपुरवठ्याच्या नियोजनातील त्रुटींचा फटका नाशिककरांच्या वाहतुकीला बसल्याचे चित्र आहे.


