श्रावण सोमवार आणि त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. यंदाही होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष वाहतूक नियमन जाहीर करण्यात आले आहे.
पहिल्या श्रावण सोमवारसाठी रविवार १६ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपासून सोमवार १७ ऑगस्ट रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक नियमन लागू राहणार आहे. त्यानंतर २२ ते २४ ऑगस्ट, २९ ते ३१ ऑगस्ट आणि ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीतही वाहतूक निर्बंध लागू राहतील.
त्र्यंबकेश्वर शहरात खाजगी वाहनांना प्रवेशबंदी
वाहतूक नियमनाच्या कालावधीत कार, टॅक्सी, रिक्षा आणि इतर खाजगी वाहनांना त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांची वाहने खंबाळे येथील बाह्य वाहनतळावर थांबवण्यात येणार आहेत.
खंबाळे पार्किंगमधून पुढील प्रवासासाठी भाविकांना आवश्यकतेनुसार अतिरिक्त एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
जव्हार-पालघरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
नाशिककडून जव्हार, मोखाडा आणि पालघरकडे जाणारी वाहतूक गोवर्धन, गिरणारे, धोंडेगाव, देवगाव, वाघेरा फाटा आणि आंबोली फाटामार्गे जव्हारकडे वळवण्यात येणार आहे. जव्हारकडून नाशिककडे येणारी वाहतूकही याच मार्गाने उलट दिशेने राहणार आहे.
अत्यावश्यक सेवांना सूट
एसटी बसेस, शालेय वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने आणि आपत्कालीन सेवांच्या वाहनांना या नियमनातून सूट देण्यात आली आहे. तसेच ओळखपत्र सादर करणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या वाहनांनाही प्रवेशाची परवानगी राहणार आहे.
संभाव्य गर्दी लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांनी गर्दीच्या कालावधीत त्र्यंबकेश्वरला येणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तक्रार निवारणासाठी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.


