नाशिक शहरासह धरण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून ४९० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा सुमारे ८० टक्क्यांवर पोहोचला असून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूर मध्यमेश्वर धरणाचा विसर्ग १०,२५२ क्युसेक्सने वाढवून १३,४०७ क्युसेक्स करण्यात आला आहे. तसेच पालखेड धरणातून १०,३३२ क्युसेक्स आणि दारणा धरणातून २,६४८ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रातील जनावरे, शेतीची साधने आणि इतर साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.