नाशिकच्या मखमलाबाद परिसरात रस्त्यालगत सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ड्रीम कॅसल सर्कल आणि बिझनेस इंडेक्स लॉन परिसरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा खोदकाम सुरू झाल्याने प्रशासनाच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे आणि अर्धवट अवस्थेतील कामामुळे वाहतुकीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खोदलेली माती रस्त्यावर येत असून वाहन घसरण्याचा धोका वाढला आहे. तसेच रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश आणि पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, संबंधित काम तातडीने पूर्ण करून रस्ता सुरक्षित करावा तसेच आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.


