नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भदर ग्रामपंचायत हद्दीतील करंजाळी गावात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना विशेषतः पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग पूर्णपणे कच्चा असून पावसाळ्यात चिखल आणि पाण्यामुळे तो अधिकच खराब होतो. त्यामुळे अंत्ययात्रा घेऊन जाणेही अत्यंत जिकिरीचे ठरत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या समस्येबाबत अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सर्वहंगामी पक्का रस्ता मंजूर करून तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे केली आहे. आता या मागणीवर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे करंजाळी गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.