नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वर्षानुवर्षे पडून असलेल्या जप्त वाहनांमुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर जप्त दुचाकी, चारचाकी तसेच वापरात नसलेली काही शासकीय वाहनं उभी असल्याने नागरिकांना वाहन पार्क करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे.
दररोज विविध शासकीय कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पार्किंगसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांसाठी असलेली जागा जप्त वाहनांनी व्यापल्याने कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय, पार्किंग शेडची दुरवस्था, परिसरातील भटकी कुत्री आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडत असल्याचे सांगितले जात आहे. परिसराची नियमित स्वच्छता आणि देखभाल करण्याचीही मागणी होत आहे.
जप्त वाहनांचा तातडीने निपटारा करून पार्किंग व्यवस्था सुधारावी तसेच नागरिकांना सुरक्षित आणि पुरेशी पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.


